Skip to main content

काला खट्टा सरबत (लेखिका: नंदकिशोरी जांभळे)



उन्हाच्या झळाळत्या झळ्यात थंडगार सरबत घश्यालाच पोटालाच नाही तर मनालाही गारवा आणते. बर्फगोळा खाण्याची आवड असणार्‍यांना तर कालाखट्टाचा बर्फ गोळा मिटक्या मारत खाण्यातील गोडी सांगायलाच नको. त्या गोळ्याची आंबट गोड घरच्या घरी अनुभवण्यासाठी बर्फ नाही पण सरबताचा हा खटाटोप काल केला आणि यशस्वी देखिल झाला मग सर्वांसोबत तो शेअर करावा म्हणून हा अजून एक खटाटोप. गोड, आंबटगोड, जिभेला मिटक्या मारायला लावणारा काळ्या लवणाचा खरटपणा!

साहित्य: ३ ग्लास सरबतासाठी

१. छान पिकलेली टप्पोरी जांभळं १५-२०

२. साखर- ८-१० चमचे (चहाला साखर घलताना वापरतो ते)

३. काळे मीठ दळून. ३/४ टेबल स्पून

४. साधे मीठ चवीनुसार

५. २ लिंब मध्यम आकाराची.

६. जीरपूड १/२ टेबल स्पून

७. पाणी आणि बर्फाचे तुकडे


कृती:

१. सर्वप्रथम जांभळातील बिया काढून हलकेसे मिक्सर मध्ये दळून घ्या..

२. दळलेल्या जांभळात लिंबाचा रस, साखर, मीठ, काळे मीठ घालुन थोडावेळ मुरु द्या..

३. नंतर पुन्हा मिक्सर मध्ये थोडे फिरवून नंतर गाळुन घ्या.

४. हे मिश्रण थंड करुन त्यात नंतर जीरपूड आवश्यक तेवढे पाणी घाला. वर थंड करायल ठेवा.

५. ग्लास मध्ये सरबत घेऊन वर हवे असल्यास बर्फाचे खडे टाकून गट्टम करा!

६. बर्फ गोळ्यासारखे खायचे असल्यास बर्फाचा चुरा करून त्यावर पाणी न घालता वरील कॉन्सन्ट्रेट वापरून गट्टम करा