Skip to main content

हास्य हार्मोन की जय



आज 5 मे 2024 रोजी जागतिक हास्य दिन आणि जागतिक व्यंगचित्रकार दिन एकाच दिवशी आले हा एक दुग्ध शर्करा योग किंवा डबल हास्ययोग निर्माण झाला. काही लोक जीवनातील अगदी छोट्या छोट्या प्रसंगात आणि विसंगतींमध्ये ही विनोद शोधून हसतात. काहीजण इतरांनी सांगितलेल्या छोट्या विनोदावरही खळाळून असतात. सोशल मीडियावर प्रसारित होणारे जोक्स , मिम फॉरवर्ड करताना आपल्या मनात सर्वात आधी जे मित्र किंवा मैत्रीण आठवतात तेच खरे तर आपले सच्चे मित्र असतात. कारण आपण आपले हास्य अशा दर्दी मित्रांसोबत सुद्धा शेअर करू इच्छितो. दुःख वाटल्याने अर्धे होते, सुख वाटल्याने द्विगुणीत होते आणि हास्य वाटल्याने नक्की त्रिगुणीत होते. जी फॅमिली एकत्र बसून हसू शकते तीच खरी फॅमिली. 


कॉमेडी सिरीयल आणि चित्रपट बघताना किंवा विनोदी पुस्तक वाचतांना त्यातील छोटे छोटे विनोद सुद्धा आपल्याला खळाळून हसवतात. त्यामुळे संपूर्ण दिवस फ्रेश जातो. अर्थात कॉमेडी चित्रपट बघताना आपल्या सोबत जर आपल्यासारखाच विनोदाचा दर्दी आणि आपल्यासारखाच विनोदाची जाण असणारा आणि मनापासून खळाळून हसणारा मित्र किंवा मैत्रीण असेल तर हास्य आणखी द्विगुणीत होते आणि नेहमीपेक्षा तिप्पट हसू येते. विनोद झाल्यावर हसताना एकमेकांकडे बघून एकमेकांना टाळी देत हसणे हे तर निकोप आणि दर्दी हास्य रसिकांचे लक्षण असते.


काही लोक मात्र अख्खा विनोदी चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोरून सुरू होऊन संपतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची पुसट रेषा सुद्धा उमटत नाही. उलट ते चित्रपटातील विनोदाचे विश्लेषण करत बसतात. त्यात लॉजिक शोधत बसतात. अरे, असे कुठे असते का? तो अभिनेता असेच का म्हणाला? खऱ्या जीवनात असं कुठे होतं का? असं कुणी कुणाला म्हटलं तर संस्कार आणि संस्कृती नष्ट होईल, वगैरे वगैरे. मुलं असं आई वडिलांशी उद्धट बोलू शकतात का (तारक मेहता का उलटा चष्मा), विद्यार्थी शिक्षक एकमेकांशी असे बोलतात का (कॉमेडी एक्स्प्रेस). अरे  बाबांनो ते विनोदी स्किट आहे. तिथे अतिशयोक्ती असणारच आहे. अशा लोकांवर विनोदाचे संस्कार करण्यासाठी क्लासेस सुरू करावे की काय असे वाटते. खरे तर ज्यात अतिशयोक्ती किंवा विसंगती नाही तिथे विनोद निर्मिती शक्य नाही. 


अहो, रोजचे जीवन तर हे कित्येक दुःखांनी, टेन्शन आणि काळज्यांनी भरलेले आहे. खऱ्या जीवनात आपोआप विनोद घडणे मुश्किल आहे. जीवनात विनोद शोधला पाहिजे, तरच सापडतो आणि त्यासाठी मुळात विनोदी वृत्ती अंगी असली पाहिजे. जोक्स, विनोदी चित्रपट, स्टँड अप कॉमेडी, विनोदी सिरियल पाहून रोज हसले पाहिजे. अर्थात द्वेषमूलक पद्धतीने मुद्दामहून विनोदाचा वापर इतरांच्या दु :खावर मीठ चोळण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी, इतरांना नामोहरम करण्यासाठी केला तर तो चूकच! विनोद हा जाती, धर्म, तसेच कुणाच्या व्यक्तिगत आणि खासगी जीवन यावर प्रहार न करता विविध मानवी वृती आणि प्रवृत्तींवर प्रहार करणारा असावा.


आपण हसलो की कोणतेतरी हार्मोन आपल्या शरीरात निर्माण होते, असे वैज्ञानिक सांगतात. हे हार्मोन लिक्विड असते की नाही, कोणत्या रंगाचे असते, किती दिवस मेंदूत मुक्काम ठोकून असते हे काही मी कोणाच्या मेंदूत शिरून पाहायला गेलो नाही. ते वैज्ञानिकांचे काम. 


मला तर वाटते की आपण इतके हसले पाहिजे की ते निर्माण झालेले हार्मोन जमा करून करून रोजची हजारो लिटर पाण्याची टाकी भरून ओव्हरफ्लो झाली पाहिजे आणि बादल्या भरून भरून हे हास्य हार्मोन इतरांना वाटले पाहिजे, म्हणजे सगळे जग हास्यमय होऊन जाईल आणि सकाळी खोटे खोटे हसण्यासाठी हास्य क्लब उघडायची गरज पडणार नाही. हॉ हॉ हॉ हॉ !! हॉ हॉ हॉ हॉ !! हास्य हार्मोन की जय!!