Skip to main content

कुठे गेले हे पदार्थ?



सणासुदीला आवर्जून करण्यात येणारे पदार्थ काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत की काय, अशी स्थिती आजच्या व्यग्र जीवनशैलीत निर्माण झाली आहे. ‘कुठे गेले हे पदार्थ?’ या शीर्षकाखाली असे पदार्थ आम्हाला लिहून पाठवण्याचे आवाहन आम्ही वाचकांना केले नि त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हे पदार्थ मागवण्यामागे केवळ या पदार्थांची रेसिपी शेअर करणे हा एकमेव उद्देश नव्हता, तर घरोघरी केल्या जाणाऱ्या पदार्थांसोबत प्रत्येकाची कुठली ना कुठली आठवण जडलेली असते. कुणाला आजीच्या हातच्या पुरणपोळ्यांची चव आठवत असते, तर कुणाला शेजारच्या मावशींनी आवर्जून पाठवलेल्या पातोळ्या आठवत असतात.. हे पदार्थ आम्हाला लिहून पाठवताना नि ते वाचताना वाचकांच्या या साऱ्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल!

- पाककृती ग्रुप


🥗उकडपेंडी🥗
साहित्य- एक वाटी भरडसार दळलेली कणीक, अर्धी वाटी चिंचेचे पाणी, चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, लाल तिखट, मीठ, एक मोठा डाव तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून केलेली फोडणी.
कृती- कणीक कढईत खमंग भाजून घ्यावी. फोडणी करून त्यात कणीक घालून चांगले परतावे. मीठ, तिखट, जिरे घालून परत एकदा परतावे. चिंचेचे पाणी थोडे-थोडे घालत कणीक सारखी परतत रहावी. पाणी घालताना एकाच ठिकाणी जास्त घालू कामा नये. नाहीतर कणकेच्या गुठळ्या होतात किंवा ती गच्च होते. दोन वाफा आल्यावर झाकरण काढून खोबरे-कोथिंबीर घालून गरम गरम उकडपेंडी खावी.
- सुनीता पिंपळे, नाशिक.

🥗रसातल्या शेवया🥗
साहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.
कृती- प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं वाफ येऊ द्यावी. वाफवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. पिठाचे मुठीएवढे गोळे करून घ्यावे. शेवग्यात (शेवयांचा लाकडी साचा) किंवा चकलीच्या साच्यात पिठाचे गोळे घालून शेवया पाडाव्यात.
नारळाचे दूध काढून त्यात गूळ, वेलची, जायफळ पावडर घालून रस तयार करावा. ताटलीत शेवया घेऊन, त्यात रस घालून त्याचा आस्वाद घ्यावा.
- अस्मिता गवंडी, दादर, मुंबई.

🥗सांजणी🥗
पूर्वी तांदूळ कांडप सड देऊन त्याचा भरडा घरीच उखळात कांडला जाई. हाच भरडा सांजणीला वापरला जायचा.
साहित्य- १ वाटी तांदळाचा कणीदार भरडा, १ वाटीओल्या नारळाचं दूध, - १/२ वाटी साखर, केशर- ३/४ काडय़ा, एक वेलची, जायफळ पूड छोटा (चहाचा) चमचा, चवीपुरतं मीठ आणि काजू-बदामाचे काप.
कृती- तांदळाचा भरडा कढईत कोरडा भाजून घ्यावा व नारळाच्या दुधात भिजत घालावा. अध्र्या तासाने त्यात साखर, मीठ, वेलची, जायफळ पूड घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. अध्र्या तासानंतर हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या खोलगट थाळीत ओतावे. त्यावर काजूबदामाचे काप घालावे. एका मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवून या थाळीतली सांजणी त्या वाफेवर शिजवून घ्यावी. ही गोड सांजणी थंड झाली की त्याचे चौकोनी काप पाडावे. आजच्या धकाधकीत कांडप काढणे कठीण आहे. मी हा पदार्थ थोडा बदल करून आजही करते.
१ वाटी इडलीचा जाडसर रवा (तांदळाचा), १ पॅकेट टेट्रापॅकमधलं नारळाचं दूध, उर्वरित साहित्य जसंच्या तसं आणि फक्त ढोकळा करण्याच्या ताटलीत तुपाचा हात लावून प्रेशर कुकरमध्ये शिटी न लावता उकडते.
- उज्ज्वला राजे, दहिसर, मुंबई.

🥗घावन-घाटले🥗
साहित्य- तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, तेल.
कृती- प्रथम नारळाचे घट्टसर दूध काढून घ्यावे. त्यात आवडीनुसार गोड होईपर्यंत गूळ घालावा. नंतर वेलची पावडर घालावी. थोडेसे गरम करावे. वाटल्यास त्याला तांदळाचे पीठ लावावे. मग घाटले तयार होते. घावनसाठी तांदुळाचे पीठ पाण्यात कालवून, त्यात थोडेसे मीठ टाकून त्याचे तव्यावर घावन घालून घ्यावे. हे घावन पातळ घातले जातात. या घावन-घाटल्याचा कोकणामध्ये गौरीला (भाद्रपद महिन्यातल्या) नैवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे. चवीला खूप छान लागते.
- सुलभा दाते, बोरिवली, मुंबई.

🥗ज्वारीचे उप्पीट🥗
साहित्य- १ वाटी ज्वारीचे पीठ, लाल सुक्या मिरच्या, उडदाची भाजलेली डाळ, कढीपत्ता, २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.
कृती- ज्वारी पीठ चांगले लालसर भाजून घ्यावे. मग कढईत फोडणी करावी. एक वाटी पाणी घेऊन ते उकळवावे. पाणी चांगले उकळले की गॅस बारीक करून भाजून ठेवलेले पीठ पाण्यात घालावे. मीठ घालून चांगले हलवावे व चांगल्या दोन वाफा आणाव्यात. थोडेसे आसटच ठेवावे. वाटल्यास वरून बारीक कांदा भुरभुरावा व लिंबू पिळावे. झाले उप्पीट तयार!
- उषा खैराटकर, ठाणे.

🥗खांडवी किंवा सांदण🥗
साहित्य- १ वाटी कण्या (तांदूळ धुवून वाळवणे व मिक्सरवर कण्या करणे), एक वाटी गूळ (काळसर तांबडा रंगाचा घ्यावा हा गूळ गोड असतो), एक वाटी खवलेला नारळ, थोडी वेलची पावडर किंवा थोडा फणसाचा रस, दोन चमचे साजूक तूप.
कृती- साजूक तुपावर एक वाटी कण्या तांबूस होईपर्यंत भाजायच्या, त्यात दोन वाटय़ा गरम पाणी (आधण टाकून), दोन चांगल्या वाफा आणल्यानंतर एक वाटी गूळ, अर्धा वाटी खवलेला नारळ, वेलची किंवा फणसाचा थोडा रस टाकावा. मऊसर शिजल्यावर एका ताटाला साजूक तूप चोळून ते थापावे. त्याच्यावर पुन्हा अर्धी वाटी खवलेला नारळ टाकून वडय़ा पाडाव्या. त्या नारळाच्या दुधाबरोबर खाण्यास खमंग लागतात.
- शैलजा डोंगरे, दादर, मुंबई.

🥗हळदीच्या पानातले पातोळे🥗
साहित्य- एक मोठी काकडी (तिला तवस म्हणतात), गूळ, १ वाटी ओले खोबरे, चवीपुरते मीठ, मोहनसाठी २ चमचे तेल, तांदळाचे पीठ, ताजे लोणी, हळदीची पाने.
कृती- प्रथम काकडी किसून त्यात मीठ, तेल व आवडीप्रमाणे गूळ घालून एका पातेल्यात गरम करत ठेवावे. काकडीला पाणी सुटत असल्यामुळे निराळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. हे मिश्रण शिजल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालावे. दोन-तीन वाफा आल्यावर पातेले खाली उतरून घ्यावे. नंतर हळदीच्या पानाला तेलाचा पुसटसा हात फिरवावा. पानाच्या अध्र्या भागावर पिठाचा छोटा गोळा घेऊन पातळ थापावा (पातळ थापण्यातच कौशल्य आहे). त्यावर उरलेले अर्धे पान दुमडावे. असे ५-६ पातोळे तयार झाल्यावर ते मोदकपात्रात १५ मिनिटे उकडवावे. गार झाल्यावर हलक्या हाताने पानावरून बाजूला ताटात काढून घ्यावे. लोण्याबरोबर खाण्यास द्यावे. शिळे पातोळे सुद्धा खूप छान लागतात. श्रावण महिन्यात कोकणात पक्वान्न म्हणून हा प्रकार केला जातो.
- सुलभा दाते, बोरिवली, मुंबई.

🥗दीप अमावस्येचे गोड दिवे🥗
आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस. पितळी समई, लामण दिवा, नंदादीप, चांदीची निरांजने इतकेच नव्हे तर कंदील, चिमणी यासारखे घरातील सर्व दिवे लख्ख घासूनपुसून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जात असे. दुसऱ्या दिवसापासून सणवार, व्रतवैकल्ये, उपवास वगैरेंची रेलचेल असणारा श्रावण महिना सुरू होणार असल्याने ती उत्सुकता या दिवशी असायची. पण अजून एक आकर्षण या दिवसाचे खास असायचे ते म्हणजे, नैवेद्यासाठी केलेले कणकेचे ‘गोड दिवे’. येता जाता दिवसभर मनसोक्त खाल्ले जायचे.
साहित्य: १ वाटी जाड दळलेले गव्हाचे पीठ, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, स्वादासाठी चिमुटभर जायफळाची पूड, २ चमचे तुपाचे मोहन.
कृती- प्रथम गूळ विरघळेल एवढेच कमीत कमी पाणी घेऊन गूळपाणी तयार ठेवावे. नंतर गव्हाच्या पिठात २ चमचे गरम तुपाचे मोहन, जायफळ पूड टाकून गूळपाण्यात पीठ घट्ट भिजवून घ्यावे. ही कणिक चांगली मळून घेतल्यावर त्याचे छोटे छोटे दिवे बनवावेत. बनवून झालेले दिवे चाळणीत ओल्या कापडावर ठेवून चांगले १५/२० मिनिटे चांगले वाफवून घ्यावेत. प्रत्येक दिव्यात थोडं साजूक तूप टाकून गरमागरम खावेत. गार झालेले दिवे सुद्धा साजूक तुपासोबत खाण्यास चांगले लागतात. गुळाचे प्रमाण गोडीच्या आवडीनुसार कमी-अधिक करू शकता. मी पाठवत असलेले पदार्थ हे माझ्या लहानपणी म्हणजे साधारणत: ८० वर्षांपूर्वी केले जात असत. अजूनही काही ठिकाणी जरी हे पदार्थ होत असले तरी प्रमाण फारच कमी आहे. तात्पर्य काय तर आमची आई किंवा सासूबाई करीत असलेले हे पदार्थ ‘हल्ली न होणाऱ्या पदार्थाच्या’ यादीत समाविष्ट झाले आहेत.
- प्रवीणा जोशी, नाशिक.

🥗 गूळपापडीचे लाडू🥗
साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड.
कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले खरपूस वास येईपर्यंत भाजावे. पीठ बाजूला एका ताटात काढावे. त्याच कढईत एक वाटी बारीक तासलेला गूळ घालून वितळवावा. त्यात भाजलेले पीठ घालून ढवळावे. वरून वेलदोडय़ांची पूड व चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण एकजीव झाले की गॅसवरून उतरवावे. थोडे कोमट असताना त्याचे लाडू वळावेत.
- प्रभावती सबनीस, दादर, मुंबई.

🥗गडगिळं🥗
कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे करून ते गुळाच्या पाकात टाकणे (जिलबी तळल्यावर जशी पाकात टाकतात त्याप्रमाणे). ते लगेच पाकातून काढून खावेत. पटकन करायचं आणि गटकन गिळायचं असं हे गडगिळं.
- पद्मा कऱ्हाडे, जोगेश्वरी, मुंबई.

🥗खिचडा🥗
गरीब, लमाणी, कातकरी, मेंढपाळ या भटकणाऱ्या जमाती. यांचे बिऱ्हाड आपल्या पाठीवर असते. जेथे असू तेथे तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक करायचा हा या लोकांचा शिरस्ता.
आठवड्याचा बाजार असला की त्या जागी गहू, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चणा, तूर पडझडीच्या जागी जाऊन या बाया-बापडय़ा ते गोळा करून आणतात. एकाच भांडय़ात एकत्र करून स्वच्छ धुतात. मग एकाच भांडय़ात हे पडीक धान्य चांगले शिजवून घट्ट झाल्यावर ते उतरवतात. नंतर मिरची, मसाला, हळद पूड यांची फोडणी देऊन तो या घट्ट झालेल्या भांडय़ात घालतात. वर कोथिंबीर कापून सजवतात. यालाच सर्वजण ‘खिचडा’ म्हणतात. (खिचडी नव्हे.)
हा ‘खिचडा’ फार रुचकर व पौष्टिक लागतो. शहरातील काही लोक असा खिचडा बनवून त्यावर गुळाचा चुरा पसरवून खातात.
- खुर्शीद शेख, अंधेरी, मुंबई.

🥗घाटले🥗
एक डाव भरून तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ घ्यावे. १ वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी नारळाचा चव, गव्हाचे पीठ तुपावर भाजून घ्यावे. चिमूटभर जायफळाची पावडर, १ वाटी पाण्यात पीठ मिसळून ठेवावे. १ वाटी पाण्यात नारळाचा चव व गूळ एकजीव होईपर्यंत मिसळावा. नंतर त्यात ३ वाटय़ा पाणी घालून पातेले मंद गॅसवर ठेवावे. उकळी आली की वाटीभर पाण्यात मिसळून ठेवलेले पीठ ओतावे. ते मिश्रण व्यवस्थित ढवळावे. उकळ्या येई तो घाटले ढवळत रहावे. त्यात जायफळ पूड मिसळावी. घाटले थंड झाल्यावर फार दाट वाटल्यास थोडे उकळते पाणी मिसळून थोडा वेळ उकळावे. गरम गरम वाढावे. हे घाटले तांदळाच्या घावनाबरोबर द्यावे.
- सु. ना. आपटे, दहिसर, मुंबई.

🥗वेसवार🥗
मेतकुटाप्रमाणेच सुक्या प्रकारचं हे तोंडी लावणं. कोकणात- त्यातही राजापूरच्या बाजूला हे आवर्जून केलं जातं. मऊ भाताबरोबर चवीसाठी हे घेतलं जातं. याशिवाय फणसाची भाजी, गवारी, भोपळ्याच्या भाजीत तसेच उसळीत चव वाढवण्यासाठी घातला जातो.
साहित्य : पाव किलो तांदूळ, १०-१२ सुक्या लाल मिरच्या (तिखटाच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी-जास्त करावं.) एक वाटी अख्खे काळे उडीद, १ हळकुंड किंवा दोन चमचे हळद, धणे अर्धी वाटी, एक चमचा मेथी दाणे.
कृती : पातेल्यात तांदूळ सुकेच भाजायला घ्यायचे. तांदूळ अर्धे भाजत आले की मिरच्या घालायच्या. मिरच्या तांदळाबरोबर भाजल्या जायला हव्यात. तांदूळ काळे होईपर्यंत भाजायचे. काळे उडीद, धणे, मेथी वेगवेगळे भाजायचे. हळकुंडही भाजून घ्यायचं. हळद पावडर असेल तर जराशी कोमट करून घ्यायची. सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये दळायचं.
- चारुशीला धर, ठाणे.

🥗अननसाचे सासव🥗
साहित्य : अननसाचे तुकडे, ओले खोबरे, सुक्या मिरच्या, साजूक तूप, हिंग, मोहरी, मेथी दाणे, गूळ व मीठ.
कृती : २ चमचे ओले खोबरे व ४-५ सुक्या मिरच्यांचे जाडसर वाटण करावे. पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यात हिंग, मोहरी व ५-६ मेथी दाणे घालून फोडणी करावी. नंतर फोडणीत अननसाचे तुकडे घालावेत. गूळ घालावा. खोबरं-मिरचीचे वाटप घालावे. मीठ घालावे. हा पदार्थ गोवा-कारवारकडे केला जातो.
- पुष्पलता दळवी, वांद्रे, मुंबई.

🥗हरभऱ्याच्या डाळीचा चटका🥗
साहित्य : हरभऱ्याची डाळ, दही, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, फोडणी.
कृती : हरभऱ्याची डाळ ३ तास भिजत ठेवावी. नंतर डाळ जाडसर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर त्यात दही व मीठ घालावे. वरून खमंग फोडणी द्यावी. तोंडी लावायला हा पदार्थ खूपच छान लागतो.
- अमरेंद्र मुळये, कांदिवली, मुंबई.

🥗खोबऱ्याचे अनारसे🥗
अतिशय कष्टाचा, नाजूकपणे हाताळण्याचा, तसंच करायला थोडासा किचकट असा हा पदार्थ आहे.
साहित्य : दोन वाटय़ा सुक्या खोबऱ्याचा किस, एक वाटी दळलेली साखर, तूप आणि खसखस.
कृती : अर्धा-पाऊण तास खोबऱ्याच्या वाटय़ा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. त्यानंतर त्याची काळी पाठ काढून ते खोबरं अगदी बारीक किसून घ्यावं. तो कीस थोडा भाजून घ्यावा. त्यानंतर साधारणपणे अर्धी वाटी तूप ताटात घेऊन चांगलं फेसून घ्यावं. ते फेसलेलं तूप, साखर आणि खोबऱ्याचा कीस एकत्र करून एक चमचा साय घालून चांगलं मळून घ्यावं. मळलेल्या गोळ्याचे पेढय़ाएवढे छोटे गोळे करून ते गोल थापून त्यावर खसखस पेरावी आणि एका थाळीत ठेवून ओव्हनमध्ये तांबूस होईपर्यंत भाजावेत. अनरसे तयार.
खरी कसोटी आहे ती भाजण्याचीच. हे अत्यंत नाजूक काम असल्यानं ओव्हनमध्ये भाजतानासुद्धा काळजी घ्यावी, नाहीतर करपण्याची शक्यता असते. माझ्या आजीच्यावेळी ओव्हन तर नक्कीच नव्हता. त्यावेळी ती केकच्या भांडय़ात किंवा वाळूमध्ये भांडं ठेवून मंद विस्तवावर तांबूससर भाजत असे.
- श्रद्धा वझे, कल्याण.

🥗शिराळ्याची चटणी🥗
साहित्य : २ मोठी शिराळी, १ कांदा, ४ ते ५ पाकळ्या लसूण, चण्याच्या डाळीचा भाजून काढलेला भरडा (जाडसर पीठ) २ टेबलस्पून तेल, तिखट, हळद, मीठ, जिरे-धण्याची पूड १/२ टी स्पून, हिंग, मोहरी फोडणीला.
कृती : प्रथम शिराळी धूवून पुसून कोरडी करावी, त्याचे आडवे मध्यम आकाराचे तुकडे करावे. शिराळी किडकी नाहीत याची खात्री करावी. सर्व तुकडे फूड प्रोसेसरमधून जाडसर वाटून घ्यावे. (पूर्वी पाटय़ावर ठेचून घेतले जात असत.) यात शिराळ्याचा कोणताही भाग वाया जात नाही. नंतर मिश्रण पिळून घ्यावे. कढईत पुरेसे तेल टाका. तेल तापल्यावर मोहरी व हिंगाची फोडणी तयार करा. त्यात बारीक चिरलेला कांदा व लसूण ठेचून टाका. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद, तिखट, चवीनुसार मीठ टाकून नीट परतून घ्या. शिजण्यासाठी झाकण ठेवा. शिजत आल्यावर भाजीचा रंग बदलेल. त्यावर भरडा टाकून नीट परतून पुन्हा थोडावेळ झाकण ठेवा. वाफ आल्यावर नीट परतून मोकळी होऊ द्या. चटणी तयार. तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यास मजा येते.
- नीता देशपांडे, ठाणे.

🥗पिठल्याच्या वडय़ा किंवा आंबट गुंडाळी🥗
साहित्य- १ वाटी बेसन, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, चवीपुरते मीठ, ३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे आणि अर्धी वाटी हळद, हिंग, मोहरी घातलेली फोडणी.
कृती : बेसन, ताक व पाणी एकत्र करून घ्यावे. गुठळी झाली असेल तर मोडून घ्यावी. चवीपुरते मीठ घालून गॅसवर न थांबता घोटत ठेवावी. ‘चटक चटक’ आवाज येईपर्यंत घोटल्यावर चार मोठय़ा ताटात तेल लावून ते सारे मिश्रण चारही ताटात विभागून घालावे. अलगद तेलाच्या हाताने ते सारे मिश्रण ताटांना फासावे. त्यावर मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, ओला नारळ सर्व ताटात विभागून घालावा. त्यावर दोन मोठे चमचे फोडणी पसरून लावावी. सर्व मिश्रण ताटांवर पसरून झाल्यावर साधारण १ ते दीड इंचाच्या अंतराने त्यावर उभ्या रेघा ओढाव्यात. एक एक पट्टी अलगद गुंडाळत जावी. एका ताटातून १०-१२ गुंडाळ्या तयार होतात. एकूण चाळीस ते पन्नास गुंडाळ्या ताटात काढून घेऊन त्यावर कोथिंबीर व उरलेली फोडणी घालून द्यावी.
हा खटाटोप अत्यंत अवघड आहे. अतिशय जलदपणे करावा लागणारा, चविष्ट, देखणा पदार्थ. गुंडाळ्या न जमल्यास याच सामानाच्या वडय़ा ताटात थापाव्यात.
- पुष्पा काटदरे, कांदिवली, मुंबई.

🥗चकोल्या🥗
चकोल्या खेडेगावातील आषाढ-श्रावणातील खास पदार्थ. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत. हवा थंड. त्याकरिता एक खमंग पदार्थ. उपास सोडण्याकरितासुद्धा हा पदार्थ करतात.
साहित्य- १ वाटी शिजवलेली तुरीची डाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, चिंच, गूळ, जिरे, व सुके खोबरे भाजून कुटलेले, ओवा, २ वाटय़ा कणीक, तेल इ.
कृती- प्रथम पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी, मेथी घालून खमंग फोडणी करणे. त्यात शिजवलेली तुरीची डाळ घालून पाणी घालणे. नंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, जिरे, खोबरं घालून पातळ आमटी करणे.
नंतर कणकेत तिखट, मीठ, ओवा, हळद, गोडा मसाला, तीळ २ चमचे मोहन घालून घट्ट कणीक भिजवणे. ते मळून त्याच्या पोळ्या लाटणे, त्याचे शंकरपाळे कापणे. आता आमटी ठेवलेला गॅस मंद ठेवून त्यात ते शंकरपाळे घालणे मधूनमधून हलक्या हाताने हालवणे, चांगल्या शिजल्या की गॅस बंद करणे. (साधारण घट्टच करणे) खायला देताना त्यावर साजूक तूप, बाजूला लसूण चटणी, कांदा उभा चिरलेला व भाजलेल्या भातवडय़ाबरोबर देणे.
- सुमन सांबारे, दादर, मुंबई.

🥗चुरम्याचे लाडू🥗
हे लाडू श्रावण सोमवारी, नैवेद्याला गणपतीला, गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला मुद्दाम करतात.
कृती- १ वाटी तूप, १ वाटी पीठीसाखर आणि १ वाटी कणीक कपडय़ात सैल पुरचुंडी बांधून चाळणीवर ठेवून, दहा मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून आतला गोळा कणकेच्या हातांनी चुरडून घ्यावा. खसखशीत पीठ होईल त्यात तूप, पिठीसाखर, १ चमचा खसखस भाजून घालावी. त्यात लाडू वळावे.
शोभना माने, सी.बी.डी., बेलापूर.

🥗खापरोळी🥗
साहित्य- १ भांडं तांदळाचं पीठ (किंचित सरसरीत) पोहे भाजून मिक्सरवर बारीक केलेले पोह्याचे पीठ, २ टीस्पून तेल, चिमूटभर मीठ, खाण्याचा सोडा, २ चिमूट, मातीचे खापर (तवा) खाण्याचा चुना थोडा. २ नारळाचा चव, गूळ, वेलची पावडर.
कृती- मातीचे खापर (तवा) स्वच्छ धुवून त्याच्या मध्यभागी साधारण मोठय़ा पुरीच्या आकाराएवढा चुना ओला करून लावून ठेवावा. जरा वेळाने तो सुकतोच. त्यावर खापर पोळी घालावी.
तांदळाचे पीठ, पोह्याचे पीठ, तेल आणि मीठ घालून पाणी घालून भिजवावे. इडलीच्या पीठाइतपत ठेवावे. १५/२० मिनिटे भिजू द्यावे. ओल्या नारळाचा चव, कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा. घट्ट पिळून त्याचे दूध काढून गाळून घ्यावे. फार पातळ करू नये. जरा दाटसरच असावे. या दुधात बारीक चिरलेला गूळ कुसकरून घालावा. दूध चांगले गोड व्हायला हवे. वेलची पावडर घालावी.
मातीचे खापर गॅसवर तापत ठेवावे. तापल्यावर डावेने भिजलेले तांदुळाचे पीठ पुरीच्या आकारात ओतावे. त्यापूर्वी पिठात खाण्याचा सोडा चांगला मिसळून घ्यावा. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. तव्यावर ‘खापरोळी’ घातल्यावर दोन मिनिटे झाकण ठेवून नंतर काढावी. जाळीदार ‘खापरोळी’ नारळाच्या गोड दुधांत बुडवून ठेवावी. वाढताना बाऊलमध्ये काढून घ्यावी. नारळाच्या दुधात मुरलेली ही गोड ‘खापरोळी’ खूपच चविष्ट लागते.
- कुंदा भावे, गोरेगाव, मुंबई.

🥗गूळ, कणकेचे शंकरपाळे🥗
साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड.
कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन घालावे व तूप कणकेला चांगले चोळावे. नंतर गुळाच्या पाण्याने कणिक घट्ट भिजवून ठेवावी. अध्र्या तासाने अंदाजाने गोळे तयार करावे, एकेका गोळ्याची पोळी लाटावी. पोळी जरा जाडसर असावी. नंतर कातणीने शंकरपाळे कापावे व तुपात मंदाग्नीवर तळावे. मंद तळल्याने शंकरपाळे खुसखशीत होतात. मुलांना डब्यात देण्यास चांगला पदार्थ आहे. खूपच चविष्ट लागतात.
- संध्या प्रभुणे, यवतमाळ.

🥗पाकातल्या पुऱ्या🥗
साहित्य- ३ वाटय़ा मैदा, दीड वाटी रवा, १/२ वाटी तेल, चवीपुरते मीठ, १ वाटी आंबट ताक, २ वाटय़ा साखर, २ लिंबाचा रस, केशराच्या काडय़ा, तळणीसाठी तूप.
कृती- रवा आणि मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन आणि चवीला मीठ घालून ताकामध्ये घट्ट भिजवावे. साखरेचा एक तारी पाक करून त्यात केशर आणि लिंबाचा रस घालावा. तूपात पुऱ्या तळून लगेचच गरम पाकात टाकाव्यात.

🥗खमंग वडे🥗
साहित्य- १ किलो तांदूळ, पाव किलो अख्खे उडीद, १/२ वाटी गहू, १/२ वाटी हरभरा डाळ, एक मूठ धणे आणि पसाभर जिरे. हे सर्व मंद गॅसवर भाजून त्याचा भरडा काढावा.)
भरडा दोन वाटय़ा, अर्धी वाटी कोथिंबीर, एक चमचा ओवा, दोन चमचे तीळ, (हिंग, मीठ, तिखट चवीनुसार) दोन मोठे चमचे मोहन घालण्यासाठी, तळणीसाठी तेल, गरम पाणी हे साहित्य घेऊन वडे थापावेत व तळावेत.
- सुहास गोवित्रीकर, पुणे.

🥗आंबाडीची भाजी🥗
साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग.
कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा पुरेशा पाण्यात नरम शिजवून घ्यावा. आंबाडीच्या भाजीचे देठ काढून टाकून पाने चिरून वाफेवर मऊ शिजवून घ्यावीत. पळीने ही पाने घोटून एकजीव करून त्यात कण्या आणि शिजवलेला भरडा घालावा आणि परत एकदा घोटून घ्यावे. लोखंडी कढईत सुक्या मिरच्यांची खमंग फोडणी करावी. आवडत असल्यास त्यात ठेचलेली लसूण घालून परतून घ्यावे. मग त्यात शिजलेली अंबाडी, कण्या आणि भरडा घालून थोडं पाणी घालावे. मीठ घालून चांगले ढवळून एक-दोन उकळ्या आल्यावर गरमगरम भाकरीबरोबर खावी.
पूर्वी वर्षांचे तांदूळ भरण्याची पद्धत होती. ते चांगले चाळून कण्या वेगळ्या काढून भरले जायचे. त्यामुळे कण्या प्रत्येकाच्या घरी असत. अनेकदा डाळीचे पीठदेखील जात्यावर भरडले जायचे. त्यामुळे भरडासुद्धा वारंवार घरात असायचाच, तो अनेक पालेभाज्यांमध्ये वापरला जाई. त्याची चव वेगळीच! डाळ आणि तांदूळ दोन्हींचा वापर केल्याने प्रथिने आणि जीवनसत्त्व याचा समतोल राखला जातो.
- शुभदा गोवित्रीकर, पुणे.

🥗बाजरीचा भात 🥗
हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो.
साहित्य : एक पेला बाजरी, एक पेला तांदूळ, अर्धा पेला मुगाची डाळ. कच्चा मसाला, आलं-मिरची पेस्ट, तमालपत्रं, २ लवंग, १ दालचिनी, काळा मसाला, हळद, साखर, मीठ.
कृती : आदल्या दिवशी बाजरीला थोडा पाण्याचा हात लावून ती खलबत्त्यात (मिक्सरमध्ये नाही) जाडसर कुटून घ्यावी. त्यामुळे त्याची सालं निघतील ती पाखडून घ्यावी. दुसऱ्या दिवशी भात करताना कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात वरील सर्व कच्चा मसाला टाकून परतावे. नंतर पाखडलेली बाजरी त्यात टाकून पाणी टाकावे व बाजरी तशीच आधी शिजू द्यावी. (कारण बाजरी शिजायला वेळ लागतो.) ती थोडी शिजत आली की त्यात तांदूळ व मुगाची डाळ स्वच्छ धुवून घालावी. त्यात चवीनुसार मीठ, साखर तसेच थोडा काळा मसाला घालून, गरज असल्यास थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.
वाढताना बाजरीच्या भातावर साजूक तूप, नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा कीस व कोथिंबीर घालावी. गरम कढीसोबत गरमागरम बाजरीचा भात उत्तम लागतो.
- विद्या वावीकर, जुन्नर, नासिक