Skip to main content

आपली कर्मे, कर्माची फळे व प्रारब्ध भोग (श्रीपाद रानडे, पुणे)



कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदाहरणार्थ: मी चोरी केली, मला पकडले व त्याबद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले!

पण मी चोरी केली आणि या जन्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही.

याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात असते. हा झाला कर्म सिद्धांत!

काही कर्मे मागील जन्मातील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते. त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात. यांना निरनिराळी नावे दिली आहेत.

(१) संचित: कोण्याही मनुष्याने सांप्रत (आताच्या क्षणापर्यंत) केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील आतापर्यंत केलेया कर्मांची बेरीज. याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते.

(२) प्रारब्ध: संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार? मग जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते, त्यांना प्रारब्ध म्हणतात.

(३) क्रियमाण: प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भोग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढील जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो.

असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. पुढचा जन्म कर्मांच्या तीव्रतेनुसार व प्रकारानुसार कोणत्याही प्राण्याच्या स्वरूपात आणि त्यानंतर माणसाच्या स्वरूपात मिळतो.

यातून सुटका कधीच नाही कां? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल.

आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. आता आपल्याला वाटते आहे तसे अर्जुनाला पण वाटले.

अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले “मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात. श्वास सुरू आहे तोपर्यंत कर्मे करावीच लागतात. नुसते स्वस्थ बसून राहणे हे सुद्धा कर्म आहे”

"कर्मच करायचे नाही" हा मार्ग सुद्धा खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही.

भगवंत सांगतात की, फळे आपल्याला "कर्म केले" म्हणून मिळत नाहीत, तर त्या कर्मामागे तुमची जी वासना, कामना, भावना आणि हेतू (चांगला / वाईट) आहे त्यामुळे (आणि त्यानुसार) फळे मिळतात.

कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम (कामना रहित) बुद्धीने कर्म कर आणि फळे मला अर्पण करून युद्ध कर, म्हणजे या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत. फळाची अपेक्षा मनात न ठेवता कर्म कर. फळाची अपेक्षा मनात ठेवणे म्हणजेच आपल्या मनात काहीतरी हेतू असणे. मग असे करत करत एक काळ असा येतो, एक मानव जन्म असा येतो की त्यात अगदी शेवटचे फळ भोगून संपते आणि त्यानंतर पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागत नाही. यालाच मोक्ष प्राप्ती असे म्हणतात किंवा अनंतात विलीन होणे म्हणतात किंवा ईश्वर प्राप्ती म्हणतात.

परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही.

उदाहरण: विस्तवाने हात भाजतो हा नियम. मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो. दुर्जनांना तसेच सज्जनांनाही.

तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी. तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही.

कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो. त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत. "पेराल तेच उगवेल” हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही.

तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्‍याला देता येत नाहीत व दुसऱ्याला ती घेता येत नाहीत.

एका दुष्कृत्याचे फळ दुसर्‍या सत्कृत्याने नाहीसे होत नाही.

सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की, या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा; त्याच वेळी (मागील दुष्कृत्यांची) प्रारब्धाची फळे भोगतांना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या!

तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दु:खे कमी केलीत म्हणजे काय झाले? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दु:खे कमी झाली व त्याचे वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली.

कर्म आणि फळ हे चक्र व त्याचा हिशेब व्यवस्थित नियंत्रित आणि चालू राहावे यासाठी ग्रहांची आणि विविध देवतांची योजना परमेश्वराकडून करण्यात आली.

”राहू” हा ग्रह क्रियमाण कर्माचा कारक असून, “शनि” हा ग्रह संचिताचा कारक आहे. “केतू” हा ग्रह प्रारब्धाचा कारक असून याचे फळ हे टाळता येत नाही. म्हणजेच “केतू” हा आपले भोग हे माणसाला भोगायलाच लावतो. ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या दशा महादशा आणि अंतर्दशा आल्या की त्या त्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्या कर्माची फळे मिळायला सुरुवात होते.

परमेश्वराने सृष्टीची रचना केल्यानंतर, मनुष्याला "कर्म फळ टाळण्यासाठी“ प्रायाश्चित्य म्हणून सुधारण्याची एक संधी दिली आहे.

हे “प्रायाश्चित्य” कर्म म्हणजे “दैवी उपासना” होय. याद्वारे मनुष्य जवळ-जवळ ९५% कर्म भोग टाळू शकतो. म्हणजे दैवी उपासना हे एक असे कर्म आहे ज्याचे फळ इतर कर्माची फळे टाळण्यासाठी उपयोगी येते.

फक्त ५% कर्म भोगच माणसाला टाळता येत नाहीत. यालाच केतू ग्रहाचे “प्रारब्ध योग” म्हणतात. म्हणजे जी कर्म आधीच फलोन्मुख झालेली आहेत, ती मात्र टाळता येत नाहीत.

आपल्या वेदाचार्यांनी ”दैवी उपासना” दोन प्रकारे सांगितली आहे:

१) सदाचरण: दानधर्म करणे, भुकेल्यांना अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे, दु:खी आणि पीडित लोकांची सेवा करणे, व्यसनांपासून दूर राहणे, हिंसा न करणे वगैरे.

२) देवता आणि ग्रह उपासना: प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार अनिष्ट अथवा बलवान राशी, ग्रह, नक्षत्रानुसार देवतांची व ग्रहांची उपासना. या उपासनेव्दारे ‘आत्मशक्ती’ जागी होते आणि त्याद्वारे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा लाभ होतो व कर्म फळ कमी होण्यास मदत होते.