Skip to main content

मकरसंक्रांतीबद्दल माहिती






आजपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 

मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. नंतर साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात. या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. 

तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली. 

मकर संक्रांतीला भरपूर ठिकाणी पंतग महोत्सव देखील आयोजित केल्या जातो. पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंग आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते. या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की, थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंग उडवण्यापेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली.

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेने सगरच्या मुलांना वाचवले होते आणि गंगा सागरात विलीन झाली होती. 

साधारण 22 डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये सांगितले आहे की, उत्तरायणाच्या सहा महिन्यांच्या शुभ कालावधीत जेव्हा पृथ्वी तेजस्वी राहते, तेव्हा या प्रकाशात शरीराचा त्याग केल्यास पुनर्जन्म होत नाही (पितामह भीष्म) आणि असे लोक ब्रह्माची प्राप्ती करतात. याउलट सूर्य दक्षिणायनमध्ये असताना पृथ्वी अंधारमय होते आणि या अंधारात शरीर सोडून पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

देशात विविध राज्यात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. 

संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी संकरासुर, दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले. 

या सणापासून बदलणाऱ्या ग्रहस्थितीनुसार कलह होण्याची दाट शक्यता असते म्हणून ते टाळण्यासाठी गोड बोला असे एकमेकांना सांगून आपण हा सण साजरा करतो.

तर अशा या मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.