Skip to main content

5 जानेवारी चित्रपट त्रिकुट

पुढील वर्षी 5 जानेवारीला तीन तीन चांगले मराठी चित्रपट रिलीज होत आहेत असे आज वर्तमापत्राद्वारे छापील जाहिराती बघून कळाले. त्यांचे ट्रेलर बघितले असता कथेबद्दल अंदाज आला. 

1. ओले आले: कामाच्या व्यापात निसर्गापासून दूर जात असलेल्या सिद्धार्थ चांदेकर आणि त्याला पर्यटन करायला लावून निसर्गाच्या सानिध्यात आणणारे त्याचे वडील नाना पाटेकर अशी कथा. यात मकरंद अनासपुरे आणि सायली संजीव हे पण दिसून आले. नाना पाटेकरचे दमदार डायलॉग आणि ॲक्टिंग यात बघायला मिळेल याबद्दल वादच नाही. सिद्धार्थ सुद्धा एक आजच्या काळातील उत्तम पर्सनॅलिटी असलेला चांगला अभिनेता आहे. चित्रपट विनोदी अंगाने जाणारा हलका फुलका चित्रपट आहे, असे ट्रेलर बघून जाणवते. सायली संजीवला यात कितपत स्कोप असेल याची मला शंका वाटते. असो. टेलर बघून एवढ्यात निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. 😊

2. पंचक: माधुरी दीक्षित पती-पत्नी जोडी प्रोडक्शनचा हा चित्रपटसुद्धा ट्रेलरवरून विनोदी असल्याचे जाणवते. बहुतेक यात लेखकाने अंधश्रद्धेचा विनोदी पद्धतीने समाचार घेतला असावा. यात भारती आचरेकर, विद्याधर जोशी, दीप्ती देवी, आदिनाथ कोठारे वगैरे मंडळी आहेत. 😊

3. सत्यशोधक: निलेश जळमकर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा वेध घेतो. राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई तर संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरवरून दिसून आले की हा चित्रपट भव्य दिव्य प्रमाणात निर्माण करण्यात आलेला आहे आणि जुन्या काळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी चित्रपटात चांगली दिसते आहे. संदीप कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप चांगला असल्याने या भूमिकेत तो जीव ओतेल शंका नाही. त्याची डायलॉग बोलण्याची पद्धत अगदी हृदयापासून येते असे मला वाटते त्यामुळे त्याचे ज्योतिबा फुले यांच्या रूपातील संदेश प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने नक्की पोचतील अशी आशा वाटते. रवी पटवर्धन आणि गणेश यादव यांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहेत. 🙌🏼

एकूणच काय तीनही चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला हिट होतील आणि मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम लाभेल तसेच नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीला चांगली जाईल अशी आशा मी बाळगतो.

💥✨⭐

- निमिष सोनार, पुणे

(एक सर्वभाषिक चित्रपटप्रेमी)