Skip to main content

दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सणाचे महत्व







नमस्कार! दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

आज कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदेचा दिवस आपण साजरा करतो. यालाच दिवाळीचा पाडवा असेही म्हणतात. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष आजपासून सुरू होते. आजच्या दिवशी प्रभु श्रीरामांना राज्याभिषेक करण्यात आला. श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर तोलून धरलेल्या गोवर्धन पर्वताचीही पूजा आज केली जाते.

बळीराजाची थोडक्यात कथा:
बळीराजा हा दैत्यांचा राजा होता. तो विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू! हा अष्टचिरंजीवींपैकी एक असून दक्षिण भारतातील बहुतेक लोकपरंपरांमध्ये त्याला एक आदर्श राजा मानले गेले आहे. सद्वर्तनी, न्यायप्रिय, आणि कर्तव्यदक्ष बळीराजा प्रजाहितचिंतक शासक तर होताच, शिवाय महान विष्णूभक्तदेखील होता. तामिळनाडूतील महाबळीपुरम् ही त्याची राजधानी होती असे मानले जाते. त्याने इंद्राला पराभूत करून स्वर्गाचे आणि पृथ्वीचे राज्य मिळविले होते, पण देवतांच्या मत्सरापायी त्याला पाताळात जावे लागले.

त्याने जेव्हा इंद्राला पराभूत करून स्वर्गाचे आणि पृथ्वीचे राज्य मिळविले व देवतांना बंदिवासात टाकले तेव्हा देवांच्या विनंतीनुसार भगवान श्रीविष्णु यांनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या विष्णुभक्तीचा आणि दानशूरपणाचा फायदा घेऊन त्याचेकडून "तीन पावले भूमी" दान म्हणून मगितली, ज्यात त्यांनी विशाल रूप धारण करून त्यावर पावले ठेऊन स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य तर परत घेतलेच पण बळीच्या डोक्यावर पाय ठेऊन त्याला पाताळात ढकलले व त्याला पाताळ लोकाचा राजा बनवले. असे म्हणतात की वामनाने त्याला पाताळाचे स्वामित्व बहाल करून स्वतः श्रीविष्णू बळीच्या रक्षणासाठी द्वारपाल म्हणून उभे आहेत!

बळीने वर्षातून एकदा आपले मूळ राज्य पाहण्यासाठी पृथ्वीवर येण्याची अनुमती मागितली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या बलिप्रतिपदेला (आणि मल्याळी परंपरेनुसार ओणम् ह्या सणाला) बळीराजा पाताळातून आपले राज्य पाहण्यासाठी पृथ्वीवर येतो अशी मान्यता आहे!

त्याच्या विष्णुभक्ती आणि दानशूरपणावर प्रसन्न होऊन आजच्या दिवशी भगवान विष्णु यांनी त्याला वर दिला होता की, आजच्या दिवशी तो पाताळातून धरतीवर येईल आणि त्याची पूजा केली जाईल. केरळात ओणम् दिवशी महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात.

"इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो" असे का बोलले जाते?
"जेव्हा बळीराजाचे राज्य होते तेव्हा मनुष्यांमध्ये भेद नव्हता. जगणे सुगीचे आणि दिवस आनंदाचे होते, नैसर्गिक आपत्ती नव्हत्या आणि रोगराई नव्हती, लहान मुलांचे मृत्यू होत नसत, स्त्रिया सुरक्षित आणि आनंदी होत्या. चोरी, फसवणूक नव्हती आणि कोणीच असत्य बोलत नसे, राज्य समृद्ध होते आणि पीक-पाणी भरपूर होते. वेदपठण, यज्ञादिकर्म नित्य होत असत आणि नाट्य-संगीत कलांना योग्य महत्व होते. जेव्हा बळीराजाचे राज्य होते तेव्हा मनुष्यांमध्ये भेद नव्हता!" असे मल्याळम् लोकगीत- "मावेली नाडु वाणीडुम् कालम्" आपल्याला सांगते. कलीकाळ संपल्यानंतर बळीराजा पाताळ सोडून पुनः एकदा स्वर्गाचे आणि पृथ्वीचे राज्य करील अशी मान्यता आहे. म्हणून "इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो" असे म्हटले जाते!

विक्रम संवत्सर म्हणजे काय?
जसे शालिवाहन शकातील चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुभ मुहूर्त मानले जाते; तसेच विक्रम संवत्सरातील आजचा हा आरंभाचा दिवस (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)असल्यामुळे याला शुभ दिवस मानलेला आहे. आजच्या दिवशी विक्रम संवत 2080 सुरू झाले. विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. पंचांगात याचा वापर होतो. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही वर्षगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. सम्राट विक्रमादित्याने शकांवरील विजयानंतर ही दिनदर्शिका सुरू केली. विक्रम संवत्सर (=वर्ष) हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा 57 ने अधिक असते, कारण विक्रम संवत्सर हे सम्राट विक्रमादित्य याने ई. स्. पूर्व 57 मध्ये सुरु केले.

तर अशा या महत्वपूर्ण सणाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

- निमिष सोनार, पुणे