Skip to main content

मला डिप्रेशन आले आहे, असे म्हणण्यापूर्वी हे जरूर वाचा - सिद्धार्थ केळकर (म. टा.)

शारीरिक आरोग्य जेवढं महत्त्वाचं तेवढंच मानसिक आरोग्यही (Mental Health) महत्त्वाचं आहे, हे अनेकांना आता पटू लागलं आहे. खास करून करोनाकाळापासून मानसिक आरोग्याचं महत्त्व गेल्या तीन वर्षांत वाढलेलं दिसतं. 

आपल्यापैकी अनेक जण मानसिक आजारांसाठी असणारे काही गंभीर शब्द अगदी सहज बोलता बोलता चुकीच्या अर्थानं वापरतात. 

उदाहरणार्थ, कोणाशी भांडण झालं किंवा कोणाचा राग आला, तर ‘ती किती सायको आहे,’ असं म्हटलं जातं किंवा एखाद्या त्रासदायक घटनेच्या बाबतीत, ‘मला अगदी ट्रॉमाच झाला किंवा PTSD झाला त्या गोष्टीचा,’ असं म्हटलं जातं. 

याचबरोबर आणखी दोन संज्ञा सारख्या वापरल्या जातात. त्या म्हणजे डिप्रेशन आणि अँक्झायटी (Depression and Anxiety) 

एखाद्या गोष्टीमुळे आपण थोडे उदास असलो, तर ‘मी तर डिप्रेशन मध्येच गेले अगदी’ किंवा ‘तुमच्यासारख्या सायकोबरोबर बाहेर जायचं, म्हणजे मला ॲंक्झायटी येणार हे नक्की!’ अशी वाक्यं सर्रास कानांवर पडतात. या वाक्यांमधून गंभीर मानसिक आजारांप्रती आणि जे व्यक्ती या आजारांमधून जात आहेत, त्यांविषयीचा अनादर दिसून येतो. याला कारण म्हणजे या शब्दांबद्दल आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल असलेली तोकडी माहिती. 

आज या शब्दांबद्दल विस्ताराने जाणून घेऊयात.


डिप्रेशन

डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. याचं प्रमुख लक्षण म्हणजे मन उदास राहणं; पण केवळ मन उदास राहणं याला डिप्रेशन म्हणत नाहीत. डिप्रेशन (MDD or Major Depressive Disorder) हे एक क्लिनिकल डायग्नोसिस आहे आणि ते केवळ मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकृतीतज्ज्ञ करू शकतात. या आजाराची प्रत्येकामध्ये दिसणारी लक्षणं विविध प्रकारची असतात. ती इतर काही मानसिक आजारांबरोबरही आढळू शकतात. उदाहरणार्थ, anxiety with depression, ocd with depression. हे निदान अनेकदा किचकटसुद्धा असू शकते आणि ते करताना बराच काळही जावा लागतो. म्हणूनच आपल्याला अमुक एक आजार झाला आहे, असं निदान स्वत:च करणं योग्य नाही.

डॉक्टरकडे केव्हा जावे?

डिप्रेशनची लक्षणे कोणती हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

१. मन सातत्याने उदास राहणं. दोन आठवड्यांहून जास्त काळ जर तुमचा मूड ‘लो’ राहत असेल, मनातून उदास वाटत असेल आणि त्याचे कारण मात्र तुम्हाला समजत नसेल, तर हे डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं.

२. दुसरं म्हणजे कोणत्याही गोष्टी करताना आनंद निघून जाणं. त्या प्रक्रियेतील आनंद घेता येत नसेल, तर ते एक डिप्रेशनचे लक्षण आहे. खास करून पूर्वी ज्या गोष्टींमध्ये मजा यायची, त्या गोष्टी करताना आता तसा आनंद मिळत नसेल, तर ते डिप्रेशनचे लक्षण आहे.

३. कशातही रस न वाटणं.

४. मनाची एकाग्रता कमी होणं.

५. झोपेच्या समस्या उदाहरणार्थ, झोप न लागणं, पहाटे पहाटे जाग येणं.

६. एकाकीपणा जाणवणं, मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा घरातील इतर व्यक्तींमध्ये मिसळूनही आनंद न मिळणं.

७. भुकेमध्ये बदल होणं आणि शारीरिक थकवा जाणवणं

८. अपराधीपणाची भावना

९. स्वाभिमान कमी होणं

१०. अगदी टोकाच्या विचारांमध्ये आत्महत्येचे विचार येणं किंवा स्वत:ला काही नुकसान करून घेण्याचा विचार करणं

डिप्रेशनची ही सर्वसामान्य लक्षणं आहेत. यांसारखी काही लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तींमध्ये दिसत असतील, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. इंटरनेटवर मिळालेली, समाजमाध्यमांवर मिळालेली आरोग्यविषयक कोणतीही माहिती पूर्णपणे विश्वासार्ह असेलच, असं नाही. म्हणून तज्ज्ञांना भेटा. ते तुम्हाला पुढच्या मार्गासाठी उत्तम मार्गदर्शन करतील.

अँक्झायटी

ॲंक्झायटी म्हणजेच चिंता. ही संज्ञासुद्धा वारंवार वापरली जाते. हा बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. ‘ॲंक्झायटी डिसऑर्डर्स’ या गटात विविध प्रकारच्या ‘ॲंक्झायटी डिसऑर्डर्स’ एकत्र केलेल्या आहेत. अँक्झायटी म्हणजे मनाची अशी स्थिती, ज्यात मनामध्ये सतत भविष्याविषयी किंवा भविष्यामधील एखाद्या धोक्याविषयी सतत चिंता चालू राहते आणि अस्वस्थपणा निर्माण होतो. याचा परिणाम शरीरावरही होतो.

शरीरावर होणारे परिणाम

१. छातीत धडधडणं

२. छातीत घट्ट वाटणं

३. छाती जड होणं

४. श्वास घ्यायला त्रास होणं

५. हाता पायांना कंप सुटणं

६. घाम येणं

काही प्रमाणात ॲंक्झायटी हे सर्वांसाठी नॉर्मल आहे. आपण सगळ्यांनी ते कधी ना कधी अनुभवलं असेल. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना किंवा मुलाखत देताना पुढे काय होईल, या विचारांनी मनामध्ये एक प्रकारची चिंता वाटायला लागते. थोडीफार अस्वस्थता जाणवू शकते आणि वर पाहिलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणेसुद्धा काही प्रमाणात दिसू शकतात. मात्र, ती परिस्थिती गेल्यानंतर काही वेळाने ही लक्षणे कमी कमी होत जातात. काही दिवसानंतर ती पूर्णपणे निघूनही जातात. ही ‘एक्शियस स्टेट’ परिस्थितीनुरूप असते, तेव्हाच ती नॉर्मल असते. जेव्हा त्याची तीव्रता खूप जास्त वाढते किंवा ट्रिगर गेल्यानंतरही बराच काळ टिकून राहते, तेव्हा त्याला ‘अँक्झायटी डिसॉर्डर’ असं म्हणतात.

होणारे परिणाम
या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाते. त्यामुळे कामाला जाणं बंद अथवा कमी होणं, सतत घरी राहणं, मित्र-मैत्रिणींपासून दूर जाणं, समाजाशी नाळ तुटणं, नात्यांवर विपरीत परिणाम होणं, अशा गोष्टी घडायला लागतात.

डिप्रेशनप्रमाणेच ‘ॲंक्झायटी डिसॉर्डर’चेसुद्धा डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ निदान करतात. तुम्हाला जर यांपैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर मदत मागणं आणि योग्य ठिकाणी ती मागणं हे गरजेचं आहे. जेव्हा या लक्षणांची तीव्रता, लक्षणं जाणवण्यातलं सातत्य, त्याची वारंवारिता हाताळण्याच्या क्षमतेपलीकडे जाईल किंवा त्याच्यामुळे आयुष्यात आडकाठी येत असेल, तर जवळच्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा आवश्य विचार करावा. तज्ज्ञांना शक्य तितक्या मोकळेपणानं व प्रामाणिकपणानं तुम्ही अनुभवत असलेली लक्षणं आणि माहिती सांगणं फायद्याचं ठरेल. मानसिक आरोग्याचं निदान व उपचार शक्यतो डॉक्टरांच्या वा सायकॉलॉजिस्टच्या सल्ल्यानं घेणंच इष्ट. औषधं व कौन्सेलिंगची गरज प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी असू शकते. प्रत्येकालाच औषधांची गरज पडते, असं अजिबात नाही. मात्र, डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार घेतलेले उपचार आपल्याला मानसिक आजारांच्या विळख्यातून सोडवू शकतात.

सिद्धार्थ केळकर (म. टा.)